गडचिरोली जिल्ह्यात माओवादी चळवळ आता संपुष्टात येत असतानाच, सुरक्षा दलांना धोका पोहोचवण्याच्या आणि घातपाताच्या कारवाया करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवलेल्या स्फोटक साहित्याचा मोठा साठा गडचिरोली पोलीस दलाने हस्तगत केला आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरातून १ रायफल, २ सिंगल शॉट रायफल, २ गावठी पिस्तूल, बीजीएल लाँचरसह एकूण ६ अग्निशस्त्रे आणि मोठ्या प्रमाणावर स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले असून, काही साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले आहे.
आंतरराज्यीय सीमेवरील दुर्गम भागात लपवला होता साठा
सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्यासाठी किंवा विविध नक्षल सप्ताह व निवडणुकांच्या काळात दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी माओवादी दुर्गम व संवेदनक्षम जंगल परिसराचा वापर करतात. हे साहित्य गोपनियरीत्या जमिनीत पुरून ठेवले जात असे. दरम्यान, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि स्फोटक साहित्य लपवून ठेवल्याची पक्की गोपनिय माहिती गडचिरोली पोलीस दलास मिळाली होती.
विशेष पथकांकडून धडक शोध मोहीम.
६ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक (प्राणहिता) च्या ५ तुकड्या आणि बीडीडीएस (BDDS) ची २ पथके तातडीने संबंधित जंगल परिसरात शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आली. विशेष अभियान पथकाने संपूर्ण परिसराला घेराव घालून बीडीडीएसच्या जवानांच्या मदतीने कसून तपासणी केली. यादरम्यान जमिनीत लपवून ठेवलेला खालीलप्रमाणे विघातक साठा हस्तगत करण्यात आला:
- अग्निशस्त्रे (एकूण ६): ०१ नग .३०३ रायफल, ०२ नग सिंगल शॉट रायफल, ०२ नग गावठी पिस्तूल आणि ०१ नग बीजीएल (BGL) लाँचर.
- दारूगोळा व स्फोटके: १० नग बीजीएल सेल, २१ नग जिवंत काततुसे, ०७ नग डेटोनेटर आणि १५० मीटर केबल वायर.
- इतर साहित्य: ०२ नग मॅगझिन, ०२ नग कुकर, ०३ नग वॉकीटॉकी, ०३ नग वॉकीटॉकी चार्जर आणि ०२ नग वॉकीटॉकी बॅटरी.
याव्यतिरिक्त, घटनास्थळावरील इतर निरुपयोगी व घातक माओवादी साहित्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बि. जे., आणि पोलीस उप-अधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या देखरेखीखाली पार पडली. विशेष अभियान पथक, प्राणहिता, इंट सेल तसेच बीडीडीएस पथकातील जवानांनी अत्यंत धाडसाने ही मोहीम फत्ते केली असून पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी या यशस्वी कारवाईत सहभागी सर्व जवानांचे विशेष कौतुक केले आहे.

