
मुल : संजीवन पर्यावरण संस्था, मुल व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अनुदानित प्राथमिक तथा माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा, जानाळा, ता. मुल, जि. चंद्रपूर येथे दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी. वन्यजीव सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जण जागृती कार्यक्रम दरम्यान विद्यार्थ्यांना वन्यजीव संवर्धन, पर्यावरण संरक्षण तसेच सापांविषयीची शास्त्रीय माहिती देण्यात आली. सापांबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून सापांचे पर्यावरणातील महत्त्व, विविध प्रजाती, सापांपासून घ्यावयाची काळजी तसेच वन्यजीवांचे संरक्षण याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेश सिंह झिरे, उपाध्यक्ष प्रशांत मुत्यलपवार, दिनेश खेवले, तरुण उपाध्याय, हर्षल वाकडे, वैभव शिंदे (क्षेत्र सहाय्यक, केळझर), चव्हाण (क्षेत्र सहाय्यक, चिचपल्ली), अनिल बुटे (मुख्याध्यापक), भूषण काळे (माध्यमिक मुख्याध्यापक), वृषाली अहिरे (वनरक्षक) स्नेहा सिडाम (वनरक्षक) तसेच उमेश गवई (वनरक्षक) यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उमेश सिंह झिरे यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी वन्यजीवांचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वन्यजीवांचे अस्तित्व अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन प्रशांत उराडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पथाडे मॅडम, यांनी केले. कार्यक्रमास आश्रम शाळेतील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी प्रेम, संवर्धनाची भावना आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करण्यास मोठी मदत झाली.
