
जिवंत खवल्या मांजरांसह वाघाचे सुळे, नख व ४४ हाडे जप्त, सर्व आरोपींना १३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी.
आलापल्ली, गडचिरोली : आलापल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत आलापल्ली–सिरोंचा मार्गावरील नाग मंदिर परिसरात वन्यजीवांची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या टोळीचा वनविभागाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत जिवंत खवल्या मांजर, त्याचे पिल्लू तसेच वाघाचे सुळे, नख आणि हाडे असा वन्यजीवांचा अवैध साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणात वनविभागाने एकूण १३ आरोपींना अटक केली असून, त्यांना अहेरी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्व आरोपींना १३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी (MCR) सुनावली आहे.
वन्यजीवांच्या अवैध तस्करीबाबत विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर आलापल्ली–सिरोंचा मार्गावरील नाग मंदिर परिसरात सापळा रचण्यात आला. २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ७ ते ११ वाजेच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. रामगुंडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने संशयित हालचालींवर नजर ठेवून कारवाई केली.
तपासादरम्यान वन्यजीव आणि त्यांच्या अवयवांची बेकायदेशीर वाहतूक व तस्करी होत असल्याचे समोर आले.
या कारवाईत वनविभागाने खालील वन्यजीव व साहित्य जप्त केले—
१ मोठे जिवंत खवल्या मांजर
१ जिवंत खवल्या मांजराचे पिल्लू
वाघाचे १ नख
वाघाची ४४ हाडे
वाघाचे २ सुळे दात
३ दुचाकी वाहने
जप्त करण्यात आलेल्या वन्यजीव अवयवांमुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, या तस्करीमागे मोठे नेटवर्क कार्यरत आहे का, याचा वनविभागाकडून तपास करण्यात येत आहे.
या प्रकरणात वनविभागाने वेगवेगळ्या टप्प्यांवर कारवाई करून एकूण १३ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
चंदन बापुजी भोयर (वय ५३), रा. कोनसरी, जि. गडचिरोली
संजय पुल्ला पोरतेट (वय ४०), रा. झिमेला, जि. गडचिरोली
वासुदेव बिरसु मडावी (वय २३), रा. कोकाबंडा, जि. गडचिरोली
महेश मुसली सडमेक (वय ३२), रा. आलापल्ली, जि. गडचिरोली
गजानन गणपत सिडाम (वय ३२), रा. झिमेला, जि. गडचिरोली
कालीचरण जयराम मडावी (वय ४६), रा. गोमणी टोला, जि. गडचिरोली
राकेश बाबुराव पेगडपल्ली (वय ३०), रा. डुम्मे, ता. एटापल्ली
बापुजी पाटाळी पुंगाटी (वय ४२), रा. डुम्मे, ता. एटापल्ली
सुधाकर डोलु पुंगाटी (वय २०), रा. कोकाबंडा, ता. मुलचेरा
दिलीप माधव आत्राम (वय ४१), रा. झिमेला, ता. अहेरी
रामा दल्लु गावडे (वय ३०), रा. वासामुंडी, ता. एटापल्ली
सुभाष गणपत सिडाम (वय ३१), रा. झिमेला, ता. अहेरी
सुधाकर चंद्रशाही कोरेत (वय ४८), रा. आलापल्ली, ता. अहेरी.
या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ मधील कलम २, ९, ३९, ४४, ४८(A), ४९, ५०, ५१ व ५२ तसेच भारतीय वन अधिनियम, १९२७ मधील कलम २६(१) I व ५२ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी वनगुन्हा क्रमांक ०८१२०/२०२९८६/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
तपास अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. रामगुंडेवार यांनी सर्व १३ आरोपींना अहेरी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एच. पांचाळ यांच्या न्यायालयात हजर केले.
प्रकरणातील उपलब्ध माहिती व आरोपांचा विचार केल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना १३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी (MCR) सुनावली आहे.
जिवंत खवल्या मांजरांसह वाघाचे सुळे, नख आणि मोठ्या प्रमाणात हाडे जप्त झाल्याने या प्रकरणाकडे वनविभाग गांभीर्याने पाहत आहे. जप्त करण्यात आलेले वन्यजीव व त्यांचे अवयव कुठून आणण्यात आले, त्यांची विक्री किंवा तस्करी कोणाकडे केली जाणार होती, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास वनविभागाकडून सुरू आहे.
